कोल्हापूर दि. 17 (जिमाका) : माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत निश्चित केलेल्या सर्व घटकांसंदर्भात चांगली कामगिरी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी व्यापक लोकसहभाग वाढवावा अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
माझी वसुंधरा अभियान 2.0 संदर्भात काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ राव बोलत होते. कोल्हापूर येथून या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
श्री. राव म्हणाले, प्रत्येक घटकासंदर्भात असलेली आव्हाने लक्षात घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क देण्याच्यादृष्टीनेही अभियान महत्वाचे असल्याने त्याकडे विशेष लक्ष द्यावे. स्वच्छ भारत अभियानापेक्षा हे अभियान अधिक व्यापक असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी. विद्युत वाहन निर्मात्यासोबत बैठकांचे आयोजन करून त्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. परिसरात झालेल्या वृक्षारोपणाची नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि वृक्ष संवर्धनाचेही नियोजन करावे. जिल्हा परिषद स्तरावर अभियानाच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा आणि ग्रामीण भागातही शहराप्रमाणे जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करावा. अभियान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे सहकार्य घेण्यात यावे.
गुणांकन वाढविण्याचा प्रयत्न
महिन्यातून एकदा हवेची गुणवत्ता तपासावी. पालापाचोळा किंवा शेतातील जैवकचरा जाळला जाऊ नये यासाठी प्रबोधनाचे उपक्रम राबवावे. जनतेला सायकल वापराबाबत प्रोत्साहित करावे आणि त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयात वाहन विरहित दिवस निश्चित करून सायकलचा वापर करणे अशा उपक्रमांचे आयोजन करावे. पाचही घटकांच्या बाबतीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुणांकन वाढविण्याचा प्रयत्न करावा. अभियान शासनाचा पुढाकार आणि जनतेचा सहभाग अशा स्वरूपात पुढे न्यावे आणि त्यात समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश करावा. चांगले काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील उपक्रम इतरही ठिकाणी राबवावे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या अभियानामध्ये सहभागी झाल्याचे सांगून प्रत्येक तालुक्यासाठी पालक अधिकारी, समन्वयक व संपर्क अधिकारी नियुक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून देशी प्रजातीची झाडे लावण्यावर भर आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी अभियानासंदर्भात संदेश लिहिले जात असून चित्ररथाद्वारे अभियानाची व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. अपारंपरिक उर्जा वापर, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, बालग्रामसभा असे उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर महापालिकेमार्फत घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड, प्लॉस्टिक मुक्ती, ई कचरा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृत्रिम कुंडात गणपती विर्सजन, पर्यावरण पूरक दीपावली याबरोबरच भूमि, वायू, जल, अग्नि, आकाश या घटकामध्ये महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त कादंबरी बलकडे यांनी दिली.
सहआयुक्त पुनम मेहता यांनी सादरीकरणाद्वारे अभियानात विभागातील पाचही जिल्ह्यांच्या आतापर्यंतच्या गुणांकनाची माहिती दिली. प्रा.नूलकर यांनीदेखील यावेळी अभियानाबाबत मार्गदर्शन केले.
000000