दुर्मिळ लोकराज्य अंक प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

नागपूर,दि. 17 : नागपूर विधानभवन परिसरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘लोकराज्य’चे दुर्मिळ विशेषांक पाहून समाधान व्यक्त करतानाच या प्रदर्शनाच्या आयोजनाचे कौतुकही श्री. ठाकरे यांनी केले. ‘लोकराज्य’चे अंक संग्रही ठेवण्यासारखे आहेत, असे प्रशंसोद्गारही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी काढले.खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

विधानभवन परिसरातील ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शन स्टॉलला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी यांच्यावरील विशेषांकासह नुकताच प्रकाशित झालेला सर्व नवनिर्वाचित आमदारांचा परिचय असलेल्या ‘लोकराज्य’च्या अंकाला वाचकांची मोठी मागणी आहे. प्रदर्शनातील जुने आणि दुर्मिळ अंक विशेष आकर्षण ठरत आहेत. अधिवेशन संपेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.