मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा

मुंबई, दि. 14 : मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यासंदर्भात आज मुंबई पोलीस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात मुंबईकरांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून मुख्यमंत्री यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून ‘सुरक्षित मुंबई’साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

कंट्रोल रूमची पाहणी

आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली. यावेळी पोलीस आयुक्त श्री. बर्वे यांनी सुरक्षा यंत्रणेची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. 24 तास कार्यरत असणाऱ्या या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोनचा वापर आदींबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.