42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
मुंबई, दि.12 : मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते, यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
गोरेगाव येथील प्रबोधन क्रीडा भवन येथे 42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंत्री सुभाष देसाई यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रबोधन क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष नितिन शिंदे यांच्यासह सुनिल वेलणकर, रमेश इसवलकर, गोविंद गावडे, पद्माकर सावंत उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, 42 वर्षांपूर्वी या महोत्सवाची सुरुवात छोट्याशा रोपट्याने केली आज याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. मी या महोत्सवाचा संस्थापक असून या महोत्सवाच्या स्पर्धेच्या माध्यमातून विविध शाळेतील स्पर्धकांनी राष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार प्राप्त केले आहेत. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळामध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये स्वत:सह देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
42 व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत 191 शाळांच्या एकूण 3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. हा क्रीडा महोत्सव 12 ते 15 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, कराटे, धनुर्विद्या यासह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी स्पर्धक, शिक्षक, मार्गदर्शक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस बॅण्ड पथकासह विविध संघाच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार वायरन वास यांनी केले.
0000
राजू धोत्रे/12.12.2019