ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. 11 : राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील समाजाने आपले प्रश्न योग्य व न्यायिक मार्गाने सोडवावेत. समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळाला दिला.
ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाने यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. याप्रसंगी मंत्री सुभाष देसाई, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आणि धनगर समाजाने प्रथम एकत्र येऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ रस्त्यावर येऊन आंदोलन करुन प्रश्न सुटणार नाही तर आपले प्रश्न सनदशीर मार्गाने सुटतील, असा विश्वास त्यांनी शिष्टमंडळाला दिला.
यावेळी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.