‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती

मुंबई, दि. 10 : महामार्ग पोलीस व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये पीपल वॉलनेट ही संस्था #हायवे मॅनर्स‘ (#HIGHWAY MANNERS) हा रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उद्या बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी मरिन ड्राईव्ह येथील पोलीस जिमखान्यात दुपारी ३ वाजता होणार आहे. अशी माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगावकर यांनी दिली.

राज्यातील छोटे मोठे अपघात व त्यामुळे होणारी जीवितहानी ही फार गंभीर बाब आहे. वाहन चालवताना अनेक वेळा निष्काळजीपणा व वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळेसुद्धा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने यासंदर्भात जनजागृती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.’#हायवे मॅनर्सया कार्यक्रमातून वाहन चालवताना चालकाने घ्यावयाची काळजी व वाहतूक नियमांचे महत्त्व समजणार आहे. अपघातांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमात लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध उपाययोजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००