भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना १२ डिसेंबरला पीक विम्याच्या रकमेचे वाटप – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0
9

मुंबई, दि. 10 : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2019 मधील पीक विम्याच्या रकमेचे वाटप 12 डिसेंबर रोजी लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे विमा कंपनीला दिले.

विधानभवनात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेच्या वितरणाबाबत अध्यक्षांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे संचालक नारायण शिसोदे, भंडारा जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, विमा कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

भंडारा जिल्ह्यातील  एक लाख 61 हजार 343 धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यांनी 5 कोटी 43 लाख रुपये विम्याच्या हप्त्यापोटी जमा केले. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 67 कोटी 86 लाख रुपये मिळणार आहेत. प्रती हेक्टरी ही रक्कम 9 हजार 62 रुपये असेल अशी माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधीने यावेळी दिली.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करून जाहीर मेळावा घेण्यात यावा, त्यात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत वाटप करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये विमा वितरणासंदर्भात साशंकता राहणार नाही, असे अध्यक्ष श्री. पटोले यांनी यावेळी सांगितले.

००००

अजय जाधव/विसंअ/10.12.19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here