गदिमा, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांना ‘अलौकिक त्रिमूर्ती’च्या माध्यमातून स्वरांजली!

मुंबई, दि. 30 : गदिमा, पु. ल.आणि बाबूजी या तिन्ही सारस्वतांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अक्षरसाहित्य आणि गाण्यांवर आधारित अलौकिक त्रिमूर्तीया विशेष कार्यक्रमाद्वारे शब्दसुमनांजली आणि स्वरांजली   वाहण्यात आली.  सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाच्या वतीने  प्रभादेवी  येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

       

यावेळी  ग.दि.माडगूळकरांचे  सुपुत्र प्रख्यात लेखक आनंद माडगूळकर, बाबूजींचे सुपुत्र प्रख्यात गायकसंगीतकार  श्रीधर फडके , सांस्कृतिक कार्य  विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य  विभाग उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य  विभाग संचालक विभीषण चवरे,  सांस्कृतिक कार्य  विभाग सह संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होते.  अभिनेते ऋषिकेश जोशी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाची संहिता, संशोधन आणि आखणी केली.

महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारे अष्टपैलू लेखक  पु. ल. देशपांडे आणि मराठी माणसाच्या हृदयावर आपल्या सुरांनी आपले नाव कोरणारे बाबूजीम्हणजेच लाडके संगीतकार सुधीर फडके या त्रयीने आपल्या प्रतिभेने महाराष्ट्रात आपले युग निर्माण केले आणि कित्येक दशके मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले. ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी मिळून मराठी चित्रसृष्टीत आपले एक युग निर्माण केले. या दोघांची अनेक अजरामर गीते अलौकिक त्रिमूर्तीया कार्यक्रमात यावेळी सादर करण्यात आली . या कार्यक्रमामध्ये नचिकेत लेले  यांनी “कानडा राजा पंढरीचा”,”तुझे गीत गाण्यासाठी “, “निजरूप  दाखवा हो ” , “स्वये श्री रामप्रभू” आणि “माझे जीवन गाणे”ही गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या बरोबरच हृषिकेश रानडे याने “एक धागा सुखाचा ”, “झाला महार पंढरीनाथ”, “ने मजसी ने परत मातृभूमीला”, “घन घन माला”, ” वेदमंत्राहून आम्हा” हे गाणे सादर केले.बाबूजींची काही अजरामर गाणी या कार्यक्रमात सादर केली.तसेच “विकत घेतला  श्याम”, “माझा होशील का”,”एकाच या जन्मी  जणू “, “जाळीमंदी पिकली करवंद “आणि  “त्या तिथे पलीकडे”हे चित्रगीत भावगीत गायनात स्वत:चा अनोखा ठसा उमटवलेल्या मालती पांडे  यांची नात म्हणजेच प्रियांका बर्वे हिने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. केतकी भावे जोशी यांनी “या सुखांनो या “, “जिवलगा कधी रे येशील तू “, “नाच रे मोरा “आणि उसाला लागलं कोल्हा”, ही गाणी आपल्या खास शैलीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

      

साक्षात पु.ल साकारण्यासाठी प्रसिध्द असलेले आनंद इंगळे आणि संजय मोने  यांनी “पु.लं. आणि बबडू” हा अभिनय सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच मी ब्रह्मचारी असतो तर, असा मी असामी, बिगरी ते म्याट्रिक, गदिमांच्या दिलदारपणाचा प्रसंग पुलकित गदिमा, माझे खाद्यजीवन अभिवाचन केले. कार्यक्रमामध्ये यावेळी ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी, किस्से चित्रफितीच्या माध्यमातून  त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजेच श्रीधर फडके,  आनंद  माडगूळकर, दिनेश ठाकूर, अभिनेते रमेश देव, अभिनेत्री  सीमा देव, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ  ध्वनिमुद्रक रवींद्र साठे, या मान्यवरांनी  जागवल्या.