नागपूर,दि.4 : सावनेर शहरात 123 कोटी 26 लक्ष खर्चून बांधण्यात येणारे शासकीय विश्रामगृह व 1 कोटी 9 लाख खर्चाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासोबत खर्चाचे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान 10 खाटांचे ट्रामाकेअर सेंटर आणि नगर परिषद अंतर्गत वैशिष्टयपूर्ण योजनेंतर्गत बगीचा विकास कार्यक्रम व रस्ते विकास व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत विविध विकास कामांचे भूमीपूजन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.
या विकास कामांमुळे शहराच्या सौदर्यीकरणात निश्चितच भर पडेल, त्यासोबतच नागरिकांना वाहतुकीसाठी स्वच्छ व सुंदर रस्ते मिळणार आहेत, असे श्री. केदार यांनी सांगितले. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची समस्या अनेक दिवसापासून भेडसावत होती, या निवासस्थानामुळे त्यांची समस्या दूर होईल व भविष्यात सदनिका मिळून त्याचा फायदा त्यांच्या कार्यक्षमतेवर होणार आहे. शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीच्या लाभ येथे येणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी, लोकप्रतिधींना होईल, असे त्यांनी सांगितले.
प्राविण्य प्राप्त खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार
सावनेर येथे प्राविण्यप्राप्त खेळाडू व प्रशिक्षकाचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन हनुमानाच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन श्री. केदार यांनी केले.
येथे बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचा उपयोग बॅटमिंटन व स्कॅटिंगबरोबर इतर खेळासाठी होणार आहे. खेळामुळे शारीरीक व मानसिक संतुलन राखण्यात मदत होणार असून शरीर मजबूत व दणकट होईल. याचा उपयोग युवक युवतींना पोलीस व सैन्य भरतीसाठी होईल, असे श्री. केदार म्हणाले.
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र कॅडेट कॉर्प्स ( एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा पंतप्रधान ध्वज पटकावून देशातील सर्वोत्तम बहुमान प्राप्त करुन दिला. भविष्यातही अशीच कामगिरी कायम ठेवण्यासाठी एनसीसी व स्कॉऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नरत रहावे. खेळामुळे जिकण्याची जिद्द व भेदभाव विरहीत वातावरण निर्मिती होण्यास मदत होते, असे ते म्हणाले.
यावेळी खेळात आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच विद्यापीठातील गोल्ड, सिल्हर, बाँझ पदक प्राप्त खेळाडू व प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार वेदश्री देशपांडे यांनी केले.
या दौऱ्यात पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, तहसिलदार प्रताप वाघमारे, प्रताप पराते, नगरसेवक सुनील चोपकर, क्रीडा व्यवस्थापक योगेश पाटील, पवन जयस्वाल, प्रकाश कुंभारे तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
*****