मुंबई, दि. 11 : नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी आल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन श्री. शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना जिविताचा धोका उद्भवू नये यासाठी अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री, (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतर नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांनी घेतला.
याबाबत मंत्रालयीन दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष)श्री. संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) श्री. राजेंद्र सिंग, अपर पोलीस महासंचालक (नियोजन)श्री . संजय कुमार वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था)श्री. सुहास वारके, सहआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग श्री. सुनील कोल्हे, ठाणे शहरचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. अशोक मोराडे, ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
०००