नाशिक दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना काळात विकास कामे करण्यावर मर्यादा येत होती, परंतु आता शासनाने निधी खर्चास परवानगी दिल्याने नवीन विकास कामांसोबतच राहिलेल्या कामांचा बँकलॉग सुद्धा भरून काढला जाणार असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येवला येथील जळगाव नेऊर व निफाड येथील शिरवाडे (वाकद) येथे आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे,येवला उपविभागीय अधिकारी विजय शर्मा,तहसिलदार शरद घोपरडे,प्रमोद हिले,सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता पी टी सोनवणे,पोलीस निरिक्षक राहुल वाघ, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील, सरपंच डॉ. श्रीकांत आवारे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, विकास ही न थांबणारी प्रक्रिया असून, हा विकास अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या मार्च महिन्यापर्यत रस्त्याची कामे जलदगतीने पूर्णत्वास न्यावी असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन जास्त होते. शासनाने वायनरी संदर्भात घेतलेला निर्णय हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यातून नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
घरकुल योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
यावेळी शिरवाडे (वाकद) येथील अशोक मोरे, रवींद्र निकम, पोपट पवार, दत्तात्रय आवारे व भगवान चिताळकर या पाच घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना प्रातिनिधी स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
निफाड येथील शिरवाडे (वाकद) येथील या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण
ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत प्रभावती नगर येथे सामाजिक सभागृह कामासाठी रूपये १२ लाख, एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेअंतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी रूपये ८ कोटी ५० लाख,मुलभुत सुविधा अंतर्गत सामाजिक सभागृह कामासाठी रूपये १० लाख, जिल्हा परिषद १५ वा वित्त आयोग स्तर विकास कामे अंतर्गत भुमिगत गटार कामासाठी रूपये ३ लाख, पंचायत समिती १५ वा वित्त आयोग स्तर विकास कामे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी रूपये ४ लाख, ग्राम पंचायत स्तर १५ वा वित्त आयोग अंतर्गत आवारे बस्ती येथे स्ट्रिट लाईट बसविणे कामासाठी रू १ कोटी ९९ लाख, ग्राम पंचायत स्तर १५ वा वित्त आयोग अंतर्गत प्रभावती नगर येथे सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी रूपये २ कोटी ६० लाख, ग्राम पंचायत स्तर १५ वा वित्त आयोग अंतर्गत सार्वजनिक विहिर दुरुस्ती कामासाठी रूपये १ कोटी ३० लाख, जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभुमी संबंधित कामांसाठी रूपये १२ लाख या कामांचे लोकार्पण तसेच जलजीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना कामासाठी रूपये १ कोटी ६० लाख, आमदारांचा स्थानिक विकास योजनेअंतर्गत शिरवाडे येथे अदिवासी वस्तीला जोडणारा रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी रूपये १५ लाख, ग्राम पंचायतस्तर 15 वा वित्त आयोग स्तर विकास कामे अंतर्गत भुमिगत गटार कामासाठी रूपये 3 लाख या कामांचे भुमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले.
येवल्यातील जळगाव नेऊर येथील कामांचे भूमीपूजन व लोकार्पण
मुखेड जळगांव नेऊर सातारे पिपरी ठाणगांव गुजरखेडा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 71 किलो मीटर 00 ते 6/700 या लांबीचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी रूपये 2 कोटी 45 लाख, जळगांव नेऊर येथे मुलभूत सुविधा अंतर्गत सभामंडप कामासाठी रूपये 15 लाख, येवला पारेगांव निमगाव मढ महालखेडा भिंगारे पुरणगाव प्रमुख राज्य मार्ग 2 रस्ता व प्रमुख जिल्हा मार्ग 74 किलो मीटर 0/00 ते 23/200 मध्ये रस्त्याची सुधारणा करण्यासाठी रूपये 2 कोटी 78 लाख याकामांचे भुमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
0000000000