लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा

0
7

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देशातील सर्व राज्यांच्या संस्कृती व परंपरांची ओळख करून देण्यासाठी उपक्रम मसुरी, दि. 16 : महाराष्ट्र राज्याच्या थोर परंपरेचे दर्शन लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी (उत्तराखंड) येथे महाराष्ट्र दिन‘कार्यक्रमात झाले.

मसुरी (उत्तराखंड) येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देशातील सर्व राज्यांच्या संस्कृती व परंपरांची ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमातील एक भाग म्हणून15 नोव्हेंबर 2019 रोजी ‘महाराष्ट्र दिन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आली होती. अकादमीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. यात मराठी अधिकाऱ्यांसोबत अमराठी अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.

          

या कार्यक्रमानिमित्त दिवसभर महाराष्ट्रीय वातावरण जोपासण्यात आले. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणात महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला. सायंकाळच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान वडापाव-मिर्चीचा नाश्ता तर रात्रीच्या जेवणात कोल्हापुरी जेवणाचा समावेश होता.

          

सायंकाळी अकादमीतील मराठी व अमराठी अधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून सहभाग घेतला. यावेळी अकादमीतील सर्व मराठी व अमराठी अधिकारी महाराष्ट्रीयन वेशभूषेत सहभागी झाले होते. पुरूष अधिकाऱ्यांनी फेटे बांधले होते तर महिला अधिकाऱ्यांनी नऊवारी साडी व नथ परिधान केली होती. तसेच मुंबई येथील पृथ्वी इनोव्हेशन्स ग्रुपच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकादमीतीली संपूर्णानंद ऑडिटोरियममध्ये करण्यात आले होते.

          

लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या या’महाराष्ट्र दिन’कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ सहभागी झाले होते. अकादमीच्या कर्मशीला हॉलमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने संपूर्ण दिवस प्रदर्शनी लावली होती. या प्रदर्शनीत महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे पैठणी साडी/पर्सच्या स्टॉलसोबत कोल्हापुरातील हुपरी ज्वेलरीचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच काही साड्यांवर 50 टक्के सूटही देण्यात आली होती.

         

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या  जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा व महाराष्ट्र सदनच्या व्यवस्थापक भगवंती मेश्राम यांना’महाराष्ट्र  दिन’ कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे प्रशिक्षण समन्वयक  निरंजन  सुधांशु  यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here