बालकामगार समस्येच्या उच्चाटनासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक – कामगार आयुक्त

मुंबई, दि. 15 : बालकामगार या समस्येचे उच्चाटन करण्याकरिता समाजातील सर्व घटकांचे सहकार्य व योगदान आवश्यक असून त्याकरिता व्यापक जनजागृती करुन समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे अनिवार्य आहे, असे कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.  

बालकामगार या अनिष्ट प्रथेचे प्रामुख्याने धोकादायक व्यवसायातून व इतर व्यवसायांतून उच्चाटन करण्यासाठी व या समस्येबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याकरिता व्यापक जनजागृतीचे विशेष अभियान कामगार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत दि. 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीकरिता राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत बालदिनाचे औचित्य साधून दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी कामगार भवन, कामगार आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई येथे बालकामगार समस्येबाबत संदेश देणारे बॅनर्स, घोषणा, घोषवाक्य, चित्रफित दर्शवणारे चलचित्र रथाचे उद्घाटन कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती व समाजातील संवेदनशीलता वाढविण्याकरिता विविध प्रकारचे बॅनर्स व स्टिकर्स यांचे कामगार आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चलचित्र रथाद्वारे मुंबईमध्ये अतिअल्प उत्पन्न गट असलेल्या क्षेत्रामध्ये धारावी, कुर्ला व बेहरामपाडा येथे जागृती करण्यात आली.          

           

कामगार आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेचे दि. 7 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष तपासणी मोहिम राबविली जाणार असून या मोहिमेअंतर्गत विशेषत: वीट भट्टी, हॉटेल्स, ढाबा, औद्योगिक क्षेत्रातील विविध आस्थापना येथे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच व्यापारी वर्गामध्ये या समस्येबाबत जागृती निर्माण व्हावी व त्यांना याकरिता जिल्ह्यांतील बाजारपेठांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून बालकामगार प्रथेविरुद्ध संदेश देणारे विविध प्रकारचे बॅनर्स व स्टिकर्स हे सार्वजनिक क्षेत्रात दर्शनीय भागात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सुधारित बालकामगार अधिनियमांतर्गत माहिती देण्याकरिता मालक संघटनांसोबत चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.

बालकांना कामावर न पाठवता त्यांना चांगले शिक्षण देणे, त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करणे ही जबाबदारी प्रामुख्याने पालकांची आहे. त्यामुळे पालकांमध्ये बालमजुरी प्रथेच्या अनिष्ट परिणांमाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन विचारात घेऊन या मोहिमेअंतर्गत अति अल्प उत्पन्न गट असलेल्या वस्त्यांमध्ये पालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच विविध महानगरपालिका शाळांमधील मुलांमध्ये या समस्येबाबत जागृती निर्माण होण्याकरिता बालकामगार प्रथा प्रतिबंध करणे या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. घरगुती बालकामगार या समस्येबाबत‍ समाजामध्ये जागृतीचा अभाव आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये इतर राज्यांतून बालकामगार घरकामाकरिता आणले जातात. या समस्येबाबत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे कामगार आयुक्त यांनी सांगितले.

            

000