दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 6 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रलेखनाची जुनी संस्कृती जपून भविष्याकडे वाटचाल करणे काळाची गरज असल्याची भावना राज्यपालभगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय डाक विभागाच्यावतीने आयोजित मुंबई जिल्हास्तरीय दोन दिवसीय दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रदर्शनाचे कौतुक करीत राज्यपाल म्हणाले, टपाल तिकीट लावून पत्र लिहिण्याची संस्कृती दुर्मिळ होत चालली आहे. अशातच इतिहासाची जाण ठेवून जुन्या संस्कृती जपण्यासाठी डाक विभाग राबवित असलेल्या नवनव्या संकल्पना प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचे एकविसाव्या शतकात दुर्मिळ टपाल तिकीटे आणि पत्रांच्या संग्रहातून पूर्वजांच्या संस्कृतीची जपणूक करणे काळाची गरज बनली आहे. देशाला लाभलेल्या अनेक महापुरुषांनी इतिहासाची कास धरुन भविष्याकडे वाटचाल केल्यामुळे आज त्यांना ख्याती प्राप्त आहे आणि आजही त्या व्यक्ती सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे इतिहासाला स्मरणात ठेवून वर्तमानकाळात जगणे इतकेच महत्त्वाचे आहे. पूर्वजांचा इतिहास स्मरणात ठेवून प्रत्येकाने आदर्श जीवन जगण्याची आवश्यकता आहे.
जुन्या वस्तू स्मरणात राहाव्या यासाठी टपाल तिकीट प्रदर्शनासारख्या नव्या संकल्पनांच्या माध्यमातून संस्कृती जपण्यात भारतीय डाक विभाग मोलाचे योगदान देत आहे. ही अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब असल्याचेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी देशातील विविध टपाल तिकिटांचा संग्रह असलेल्या प्रदर्शनाची राज्यपालांनी पाहणी केली. तसेच महात्मा गांधी यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेवर आधारित आणि महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्य संस्कृतीचा उल्लेख असलेल्या कव्हरचे अनावरण करण्यात आले.
या मुंबईपेक्स टपाल तिकीट प्रदर्शनात 192 दुर्मिळ टपाल तिकिटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. टपाल तिकिटांच्या संवर्धनाबाबत नवयुवकांना प्रोत्साहित करणे आणि जनजागृती करणे असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
राज्यपालांचे पहिले पत्र
पत्रलेखनाची संस्कृती जपण्याची गरज सांगून डाक विभागाने आयोजित केलेल्या ‘ढाई अकर’ या पत्रलेखन स्पर्धेसाठी पहिले पत्र राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी टपालातून पाठवले.
या कार्यक्रमाला मणिभवनच्या सचिव गांधीवादी उषा ठक्कर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिषचंद्र अग्रवाल, शेफ संजीव कपूर, पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे आदी उपस्थित होते.