महाराष्ट्रातील पर्यटन संधींसाठी जगभरातील पन्नासहून अधिक पर्यटन संस्था, कंपन्यांसमवेत संवाद

0
13

लंडनच्या प्रदर्शनात महाराष्ट्रातील पर्यटनाला मोठी चालना

मुंबई, दि. 6  : जगभरातील पन्नासहून अधिक पर्यटन संस्था, व्यावसायिक कंपन्या आदींसमवेत बी टू बी बैठकांच्या माध्यमातून संवाद साधत आज लंडन येथील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टप्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. लंडन येथील पत्रकारांसाठी पत्रकार परिषद आयोजित करुन त्यामाध्यमातूनही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे तसेच पर्यटन संधींची त्यांना माहिती देण्यात आली. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेदसिंगल यांनी या सर्वांशी संवाद साधत चला महाराष्ट्राकडेचा संदेश दिला.

दिवसभर राबविण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमांना पर्यटन व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलसमोर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही पर्यटकांनी प्रतिसाद दिला. स्टॉलला भेट देत जगभरातील हजारो पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांनी पर्यटकांशी संवाद साधत महाराष्ट्रातील पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली.  

अंगकोरवाटपेक्षा अजिंठा, वेरुळ सरस

कंबोडिया येथील अंगकोरवाट मंदिराचे स्थापत्य हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षणस्थळ आहे. पण यापेक्षा महाराष्ट्रातील मंदिरांचे स्थापत्य, अजिंठा आणि वेरुळ येथील कलाकृती अधिक सरस आहेत, अशी प्रतिक्रिया लंडन येथील काही पत्रकारांनी दिली. आज पत्रकारांसमोर महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील उत्सव, व्याघ्र पर्यटन, पोषाख आणि खाद्य संस्कृती, गडकिल्ले, गुंफा, समुद्र किनारे, जंगले आदी विविध पर्यटन वैभवाची माहिती व्हीडीओद्वारे सादर करण्यात आली.

याशिवाय आज जगाच्या विविध भागातील ट्रॅव्हल कंपन्या, टूर ऑपरेटर, पर्यटन-पुरातत्व-हेरिटेज क्षेत्रातील तज्ञ, ट्रेकर, वाईल्ड लाईफ प्रेमी, जंगल सफारी तसेच क्रुझ पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक, हौशी पर्यटक, पत्रकार अशा विविध घटकांसोबत राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यांनी बी टू बी बैठकांच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्राचे पर्यटन वैविध्य दाखविण्यासाठी जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्रात घेऊन यावे. त्यासाठी सर्व पर्यटन संस्था, व्यावसायिक यांना राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

वीणा वर्ल्डचे संचालक सुधीर पाटील यांनीही आज महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला भेट दिली. सचिव विनिता वेद-सिंगल, पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांनी त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here