अमरावती, दि. ४ : पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच अधिकाधिक रोजगारनिर्मितीचा प्रयत्न आहे. विविध उद्योग, लघु उद्योगांद्वारे औद्योगिक विकास व भरीव रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्नरत असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी आज ममदापुर येथे सांगितले.
तिवसा तालुक्यातील वणी ममदापुर येथे सुमारे दीड कोटी रूपये निधीतून रामा ३०० पासून दापोरी जावरी काटसूर ते राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांची सुधारणा, भराव पूल बांधकाम, मोरी बांधकाम आदी विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प.सभापती पूजा आमले, पं स सभापती शिल्पा हांडे, मुकुंद पुनसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरताडे, गटविकास अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते. दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याचा शुभारंभ व ममदापुर सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते यावेळी झाला.
पालकमंत्री श्रीमती ठाकुर म्हणाल्या की, रस्ते, पूल, नाल्या, इमारती आदी विविध पायाभूत सुविधांची कामे जिल्ह्यात सर्वदूर होत आहेत. अनेक कामांची मनरेगाशी सांगड घातल्याने रोजगारनिर्मिती साध्य होत आहे. तिवसा तालुक्यात ४० कोटींची कामे होत आहेत. मनरेगातून अधिकाधिक कामांना चालना द्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
पायाभूत सुविधांची सर्वदूर निर्मिती होत असतानाच तालुक्यात उद्योग, लघुउद्योग, तसेच महिलाभगिनिंच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायांची उभारणीला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.
यावेळी त्यांनी ममदापुर येथील आरोग्य उपकेंद्र बांधकामाची पाहणी केली व काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.