दिव्यांगांकडून होणार १०६ मतदार केंद्रांचे संचालन; मतदान केंद्राध्यक्षासह सर्वच कामांसाठी दिव्यांगांची नियुक्ती

0
12

मुंबई, दि. 17 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 106 मतदान केंद्रे ही दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 8 मतदान केंद्रे ही लातूर शहर मतदारसंघातील असून त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात 6 मतदान केंद्रे ही दिव्यांग संचालित असतील.

निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तींना निवडणूकविषयक कामे देऊ नये, असे निर्देश दिले असले तरी दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे सर्व कामे करू शकतात ही बाब सिद्ध करण्यासाठी निवडणूकविषयक कामात त्यांना सहभागी करून घेतले जात आहे.

विद्यार्थ्यांचे सहाय्य

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना त्यांच्या शारीरिक मर्यादा/विकलांगतेमुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करण्यात अडथळे येऊ नये, त्यांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

शाळा, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच नागरी संरक्षण विभाग, आपत्त्कालीन परिस्थितीत काम करणारे स्वयंसेवक व गृहरक्षक दल यांची मदतनीस/स्वयंसेवक म्हणून निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर दिव्यांग आल्यानंतर त्यांच्या वाहनापासून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत त्या वाहनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी हे स्वयंसेवक पार पाडतील. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, पाणी, गरज भासल्यास प्रसाधनगृह व प्रथमोपचार यांची उपलब्धता करून देण्याचे काम हे स्वयंसेवक करतील. या अनुषंगाने या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/17.10.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here