निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

0
11

मुंबई, दि. 16 : विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

राज्यात दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण आयोजित करण्यास; तसेच वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसेच मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी 48 तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनियन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.16 ऑक्टोबर 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here