मुंबई, दि. 16 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.
लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क – श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली – 110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/16.10.2019