१८ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज

1
13

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

मुंबई, दि. 16 : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २०दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here