गडचिरोली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
गडचिरोली, दि. 12 :गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरा सुरु आहे. गडचिरोलीमध्ये झालेल्या आढावा बैठकीसाठी त्यांच्या सोबत राज्याचे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विशेष खर्च निरीक्षक, भारत निवडणूक आयोग मुरली कुमार, महानिरीक्षक मिलींद भारंबे, कायदा व सुव्यवस्था उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक तयारीबाबत विविध विषयावर त्यांनी माहिती घेतली. यामध्ये मतदान केंद्र संख्या व ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट संख्या, कर्मचारी संख्या, सुरक्षा आढावा, मतदान जनजागृती अभियान, मतदानाची वेळ इ. विषयावर चर्चा झाली. त्यांनी यावेळी केलेला तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी जिल्ह्यातील निवडणुकीबाबत तपशील सादर केले. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सुरक्षा व त्याअनुषंगाने सादरीकरण केले. यावेळी उप महानिरीक्षक मिलींद तांबाडे यांनी निवडणूक तयारीबाबत आयोगाला माहिती दिली.
चंद्रभूषण कुमार यांनी आढाव्या दरम्यान मतदार जनजागृतीबाबत विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवावेत अशा सूचना दिल्या. तसेच यावेळी विशेष खर्च निरीक्षक मुरली कुमार यांनी खर्च विषयक आढावा घेतला.
या आढावा बैठकीत गडचिरोलीसह गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते. या आढावा बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी आयोगाकडून नेमण्यात आलेले निवडणूक निरीक्षक प्रविण गुप्ता, आर.एस.धिल्लन, युरींदर सिंग, हिंगलजदन, वीआरके तेजा, लवकुमार, अभ्र घोष उपस्थित होते.
*****