देवळाली तोफखाना स्कूलच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त उभारलेल्या ‘रुद्रनाद‘ संग्रहालयाचे उद्घाटन
नाशिक, दि. 10 : देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना समर्थपणे करतील, असा विश्वास राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित’रुद्रनाद‘ या ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन श्री. कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार, श्रीमती मधुलिका रावत आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, मागील काही वर्षामध्ये सैन्यदलात नवनवीन पद्धतीने दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या तोफांचा समावेश करण्यात आला आहे. यात भारतीय उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. काकूल येथे सुरु झालेला तोफखाना स्कूलचा प्रवास अतिशय गौरवपूर्ण आहे. या तोफखाना केंद्रातील सैनिकांप्रती संपूर्ण देशाला अभिमान आहे, असेही श्री.कोविंद यांनी सांगितले.
देशाच्या तोफखान्याला अधिकाधिक दक्ष बनविण्यात देवळाली तोफखाना स्कूल आधारभूमी आहे. तोफखाना स्कूलमधील अधिकाऱ्यांची प्रशिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रशंसनीय आहे. देवळाली तोफखाना स्कूलचा नावलौकिक‘रुद्रनाद’ प्रमाणे गर्जत राहिल आणि देशाकडे वाईट नजरेने बघणाऱ्या शत्रूंना भयभीत करेल, अशा शुभेच्छा श्री.कोविन्द यांनी दिल्या. देशाला प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्तीशाली सैन्यदल तयार करण्यात देवळाली तोफखाना केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे गौरवोद्वारही याप्रसंगी राष्ट्रपतींनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. कोविंद यांच्या हस्ते देवळाली तोफखाना स्कूलच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती देणाऱ्या‘रुद्रनाद’ म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शतकमहोत्सवी ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’ या पुस्तकाचे प्रकाशन लष्करप्रमुख जनरल रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाची पहिली प्रत श्री. रावत यांनी श्री. कोविंद व राज्यपाल श्री. कोश्यारी यांना भेट दिली.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, मेजर जनरल संजय शर्मा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, बिग्रेडियर जे. बी. सिंग, कर्नल ए. के. सिंग, कर्नल रंजन प्रभा, कर्नल नवनीत सिंग, तोफखाना स्कूलचे वरिष्ठ अधिकारी, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.