नंदुरबार, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेली कामे तातडीने पुर्ण करावीत असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जि.प.कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा ) संजय बाविस्कर, वरीष्ठ भूवैज्ञानिक आर.ओ.बगमार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मलाताई राऊत, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले,ग्रामीण भागातील व वाड्या वस्तीतील सर्व कुटूंबांना सन 2024 पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. जलजीवन अभियानांतर्गत नळजोडणी देवून पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांना गती द्यावी. ‘हर घर नल से जल’ नुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई 55 लिटर प्रती माणसे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे हे जल जीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी दुर्गम भागात जल जीवन योजनेची जास्तीत जास्त कामे घेवून ती त्वरीत पुर्ण करावीत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गावाच्या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजुला उतारावर गटारी काढण्यात येवून तेथे शोषखड्डे तयार करुन त्या ठिकाणी पाणी भूगर्भात सोडण्याची व्यवस्था करावी. पठारावरील पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी पाझर तलावाची कामे मोठया प्रमाणात घ्यावीत यासाठी इतर विभागाची मदत घ्यावी. जिल्ह्यातील एकूण वैयक्तिक नळ जोडणीधारकांची संख्या 3 लाख 32 हजार 903 असून त्यापैकी 1 लाख 27 हजार 363 कुटूंबास नळ जोडणी करण्यात आली असून पुढील 2 वर्षांत 2 लाख 5 हजार 540 कुटूंबांना नळजोडणीसाठी नियोजन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले, जलजीवन मिशनअंतर्गत कामांच्या पूर्ततेसाठी नियोजन करण्यात आले आहे. ही कामे तातडीने पूर्ण करून घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
00