मुंबई, दि. 4 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरुपात 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.
श्री. शिंदे म्हणाले, भरारी पथके (एफएस), स्थिर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथके (एफएस), स्थिर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे सोने, चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले आहेत.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.4.10.2019