शिर्डी, दि.२८ (उमाका वृत्तसेवा) – शारिरीक कष्ट करणं म्हणजे व्यायाम नाही. महिलांनी यासाठी कामातून थोडी मोकळीक घेऊन आपले छंद जोपासले पाहिजे. स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देत स्वतः ला वेळ देणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी आज संगमनेर येथे केले.
संगमनेर खुर्द येथे आडवा ओढा येथील श्रीमती चंद्रकला नारायण मालपाणी महिला विकास केंद्र परिसरात लोकपंचायत संस्था आणि सुलभ इंटरनॅशनल मिशन फाउंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संगमनेर पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, एकविरा फाउंडेशनच्या डॉ.जयश्री थोरात, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, लोकपंचायत अध्यक्ष विजय थोरात, सारंग पांडे, सुलभ इंटरनॅशनलच्या मोनिका जैन, नीरजा भटनागर, विजया शिंदे उपस्थित होत्या.
उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, आजची स्त्री समाजाच्या सर्व क्षेत्रात पुढे गेली आहे. शासनाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कौटुंबिक हिंसाचार, पोटगी कायद्यासारखे अनेक कायदे आणले. आता शक्ती कायदा येत आहे. पुरुष जे काम करतात. ते काम महिलाही सक्षमपणे करत आहेत. तेव्हा महिलांना स्वातंत्र्य देत त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे.
महिलांचे आरोग्य हा महत्त्वपूर्ण विषय आहे. यासाठी सॅनिटरी पॅड चा वापर मासिक पाळी दरम्यान नियमित करणे. आरोग्यासाठी चांगले आहे. सॅनिटरी पॅड चे मॉर्केटिंग हा लाज वाटणारा विषय नसून याबाबत जागृती झाली पाहिजे, असे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले.
श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये नाविन्यपूर्ण योजनेसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष योजना राबविणे शक्य आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाची मदत घ्यावी. असे आवाहनही यावेळी उपसभापती गोऱ्हे यांनी केले.
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी हा सॅनिटरी पॅड प्रकल्प लोकपंचायतच्या सहकार्याने सुरू केला आहे. यामध्ये समाजाने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच अनिष्ट प्रथा निर्मूलनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुलभ इंटरनॅशनलच्या नीरजा भटनागर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकपंचायतचे सारंग पांडे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील महिला, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0000