धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगामाला लवकरच सुरवात होत आहे. धुळे जिल्ह्यात कापूस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून द्यावीत. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करून घ्यावे, अशा सूचना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज सकाळी पालकमंत्री श्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, यंदा कापसाला चांगला दर मिळाला. त्यामुळे कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पेरणीचा कालावधी, खतांचा वापर कसा करावा यासाठी गावागावांतील शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाने जनजागृती मोहीम राबवावी. पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी बँकांनी कालमर्यादा निश्चित करावी. बि- बियाणे, खते लिंकिंग केल्यास किंवा आवश्यक त्या खतांसाठी अन्य खतांची सक्ती करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. बि- बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच बि- बियाणे खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण मिळतील याची दक्षता घ्यावी. बांधावार खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव विहीत कालावधीत निकाली काढावीत. याबाबतचे कोणतेही प्रस्ताव प्रलंबित ठेवू नयेत, अशाही सूचना पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून बि- बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेत बि- बियाणे मिळेल. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 669 मिलिमीटर आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 4.16 लाख हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जोशी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार श्री. पाटील, आमदार श्रीमती गावित, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, डॉ. तुळशीराम गावित, हिलाल माळी आदींनी भाग घेतला. यावेळी कृषी, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लघु कार्यकारी गटाची बैठक संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज दुपारी जिल्हा नियोजन समितीच्या लघु कार्यकारी गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री अब्दुल सत्तार हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त श्री. टेकाळे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांच्यासह लघु कार्यकारी गटाचे सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले, जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी 236 कोटी रुपयांचा आदिवासी उपयोजनासाठी 118 कोटी, तर विशेष घटक योजनेसाठी 30 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. याशिवाय 50 कोटी रुपयांचा ‘आव्हान निधी’ उपलब्ध होवू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावेत. या निधीतून संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य, शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले.
00000