जलसंधारणासाठी प्रथमच चार हजार कोटींची तरतूद
नागपूर, दि. 2 : जलसंधारणाच्या योजनांच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीला शासनाने प्राधान्य दिले असून त्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसोबतच गडचिरोली येथे स्वतंत्र जिल्हा जलसंधारण कार्यालय तसेच वडसा येथे उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आल्यामुळे योजनांची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण सचिव दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे चित्रप्रदर्शन सीताबर्डी येथील मेट्रो स्टेशन येथे आयोजित करण्यात आले आहे. जलसंधारण सचिव श्री. पांढरपट्टे यांनी या राज्यस्तरीय प्रदर्शनाची पाहणी केली. कोरोना काळात विकासाच्या कामे होऊ शकली नाहीत. परंतु त्यानंतर योजनांना गती मिळाल्यामुळे जनतेला योजनांचा लाभ मिळत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास योजना पोहचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
जलसंधारणाच्या योजनांना प्राधान्य देण्यात आले असून यावर्षी चार हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देताना श्री. पांढरपट्टे म्हणाले की, नवीन कामे सुरु करण्यासाठी जलसंधारण महामंडळाला अधिकार देण्यात आले आहेत. त्यासोबतच जुने व अपूर्ण कामे पूर्ण करुन सिंचनासह भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या माध्यमातून योजनांच्या दुरुस्तीचे कामे घेण्यात येत आहेत.
विदर्भातील जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण व्हावित तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील सिंचनासाठी उपयुक्त ठरत असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगताना श्री. पांढरपट्टे म्हणाले की, गडचिरोली येथे स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे चंद्रपूर येथून जिल्ह्याच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तसेच नागरिकांनाही याचा त्रास होत असल्यामुळे महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तसेच वडसा येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आली असल्याची माहिती यावेळी जलसंधारण सचिवांनी दिली.
प्रारंभी माहिती संचालक हेमराज बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पांढरपट्टे यांचे स्वागत केले. तसेच प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. या प्रदर्शनामध्ये नागपूर विभागातील जिल्हानिहाय विकास कामांची माहिती असलेले पॅनल स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. याबद्दल जलसंधारण सचिवांनी विशेष कौतुक केले.
लसवंत ठरलेल्या नागपूरच्या भेंडेकाकांचा प्रदर्शनातच साजरा झाला वाढदिवस !
कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांप्रती अनोखी कृतज्ञता
नागपूर, दि. 02 : शहरातील उदयनगर परिसरातील भेंडे काकांना काल शासनाच्या संवादी व सकारात्मक जाणिवांचा अनोखा आणि कृतिशील अनुभव आला. राज्य शासनाच्या व्दिवर्षपूर्ती प्रदर्शनात भेट देण्यासाठी सहपरिवार आलेल्या श्री. हरिदासजी भेंडे यांनी कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल राज्य शासनाप्रती आर्वजून कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या वाढदिवसाच्या धावपळीतही प्रदर्शनास भेट देऊन संवाद साधणाऱ्या भेंडेकाकांचा काल जन्मदिवस असल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रदर्शनाचे आयोजक असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून या उपक्रमातच त्यांचा जन्मदिन अभिष्टचिंतनाचा सोहळा साजरा करण्यात आला !
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे चित्रप्रदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे नागपूर शहरातील सीताबर्डी मेट्रो जंक्शनमध्ये आयोजित करण्यात आले आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाला नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. मेट्रो स्थानकात हा उपक्रम आयोजित केल्याने तेथून ये-जा करणारी प्रवासी मंडळी उत्सकुतेपोटी या प्रदर्शनास भेट देऊन शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या लोककल्याणकारी उपक्रम-योजनांची माहिती घेत आहेत.
नागपूर शहरातील उदयनगर येथील रहिवाशी हरिदास किशनजी भेंडे आज सायंकाळी सीताबर्डी मेट्रो स्थानकातून आपल्या परिवारातील सदस्यांसह मार्गस्थ होत होते. उत्सुकतेपोटी ते या प्रदर्शनास भेट देण्यासाठी सहपरिवार आले. प्रदर्शनातील विविध पॅनेल्सची पाहणी केल्यानंतर त्यांनी आयोजकांशी संवाद साधला. प्रदर्शनातून चांगली माहिती मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात सरकारने केलेल्या विविध प्रतिबंधक उपायांबाबत त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. तसेच शासनाने तिन्ही टप्प्यात उपलब्ध करून दिलेल्या लसींचा लाभ आपल्यासह परिवारातील सदस्यांनी घेतल्याने आपण भीषण महामारीत सुरक्षित राहिल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. त्यांचा काल 69 वा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी ते पत्नी मंदा, मुलेमुली, जावई, नातवंडे यांच्यासह बाहेर निघाले असल्याची माहिती परिवारातील सदस्यांनी दिली. कौटुंबिक सोहळ्याच्या या धावपळीतही भेंडे परिवाराने प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आल्याचे कळल्यानंतर नागपूर विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन भेंडेकाकांना वाढदिवसाच्या तसेच निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भेंडे काकांच्या परिवाराच्या हार्दिक सहकार्याने प्रदर्शनातच केक कापून त्यांच्या वाढदिवसाचा छोटेखानी सोहळा साजरा करण्यात आला.
प्रदर्शनातील पॅनल्सवर चित्र आणि मजूकराच्या माध्यमातून लोककल्याणकारी आणि जनहितासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा करणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधींकडून प्रत्यक्ष व्यवहारातच अशी अनोखी आणि औचित्यपूर्ण संवेदनशीलता अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण भेंडे परिवार भारावला. त्यांनी अतिशय कृतज्ञतेने आयोजकांसोबतच राज्य शासनाचेही मनापासून आभार मानले. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची जाणिवेने व्यक्त केलेली ही सकारात्मकता पाहून प्रदर्शनात उपस्थित असलेली इतर मंडळीही भारावली. प्रदर्शनाच्या माध्यमातून शासन मांडत असलेल्या संवादी भूमिकेची जणू त्यांना प्रत्यक्ष प्रचिती आली.