नागपूर, दि. 4 : नागपूर शहरात वास्तव्यास असलेल्या सुमारे तीन लाख आदिवासी बांधवांपर्यंत आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित सिताबर्डी येथील मेट्रो स्टेशनवरील द्विवर्षपूर्ती विकास प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आदिवासी विकास विभागातर्फे रोजगार, स्वयंरोजगार तसेच कौशल्य विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. परंतु, योजनांची परिपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने शहरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी राणी दुर्गावती नगर मध्ये विशेष उपक्रमाची सुरुवात केली असल्याचे सांगताना अपर आयुक्त रविंद्र ठाकरे म्हणाले की, संपूर्ण महिनाभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आदिवासींना वैयक्तिक तसेच गटाच्या माध्यमातून हा लाभ देणे शक्य आहे. यासोबतच शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आश्रमशाळातील शिक्षणाचा दर्जा वाढवा यासाठी विभागातील 75 शाळांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येत असून यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देतानाच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी कशी करुन घेता येईल, यावर विशेष भर देण्यात आला आहे. शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचा श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणामधून तज्ज्ञ प्रशिक्षक तयार झाले आहेत. हे प्रशिक्षक सर्व शाळांमध्ये जावून प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्यासोबतच गुणवंत विद्यार्थी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्या (ता. 5) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शन सुरु राहील तरी नागरिकांनी या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.