महाराष्ट्राला ‘एनएसएस’चे दोन पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, 24 :राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचे किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन ढोले यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात‘वर्ष2017-18च्या एनएसएस’पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशातील विद्यापीठ,महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण10महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई येथील किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता बागला यांना  चषक आणि1लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर  याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना70हजार रूपये,रजत पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण29विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शाखेचा विद्यार्थी सचिन ढोले हा महाराष्ट्रातून सर्वोत्तम एनएसएस विद्यार्थी ठरला असून त्याला50हजार रूपये,रजतपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.                                                                        

००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.221 /दि.24.09.2019