राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन

0
13

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सतत प्रयत्नशील राहण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई, दि. 23 : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, नोकरी कशी मिळेल यापेक्षा आपण अनेकांना नोकरी देऊ शकतो याचाही विचार केला पाहिजे, आपले ध्येय मोठे असले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

लोअर परेल येथील आयएसडीआय टॉवर येथे इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.  या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशनचे अध्यक्ष  विजया शहानी, सिध्दार्थ शहानी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले, भारत हा तरूणांचा देश आहे. देशाचा सन्मान वाढेल असे कार्य आज तरूणांनी  केले पाहिजे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपले ध्येय निश्चित करून सतत प्रयत्नशील राहावे. यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला पाहिजे. आज अनेक लोक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन  यशस्वी झाले आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी  कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची जिद्द मनात ठेवून सतत सकारात्मक विचारातून आपले ध्येय गाठावे. आपल्यातील आत्मविश्वास हाच यशाकडे घेऊन जाऊ शकतो. विद्यार्थी ज्या संस्थेत शिक्षण घेत आहेत, त्या संस्थेचे नाव विद्यार्थ्यांनी मोठे करावे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, त्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट देऊन पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here