मुंबई, दि. २८ : ‘कोरोना‘ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना बाधितांच्या उपचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व होम क्वारंटाईनच्या सुविधांचा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आढावा घेतला. तसेच प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ते उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास केल्या.
फोर्टमधील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. शेख म्हणाले की, जी.टी.हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल,सेंट जॉर्ज हॉस्पिटल या रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षाकरिता अनुक्रमे २५०, ५० व २०० बेड प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई शहर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदार संघनिहाय १० विभाग पथके निर्माण करण्यात आली असून त्यानुसार नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी व त्यांचे सहाय्यक , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या १० विभागांसाठी वॉर्डनिहाय आराखडा तयार करण्यात येत आहे. ज्यामध्ये हॉस्पिटल जीवनावश्यक वस्तू, रक्तपेढ्या,रुग्णवाहिका व पुरवठा वाहने यांची उपलब्धता आदी गोष्टींचा समावेश आहे.
मुंबई शहरामध्ये स्थलांतरित झालेल्या रोजंदारी मजुरांकरिता विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कम्युनिटी किचनची व्यवस्था निर्माण केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई उपनगरातील माहूल येथे मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील काही हजार सदनिका विलगीकरण संकुल तयार करण्यासाठी उपयोगात आणणे शक्य आहे. असा अहवालदेखील विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
होम कॉरंटाईन व पथके :
मुंबई शहरात कालपर्यंत ३४७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. बृहन्मुंबईत एकूण ७२ पथके वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
क्वारंटाईन सुविधा :
१. शासकीय वसतिगृह उच्च शिक्षण मुंबई विभाग ७०० बेड
२. विसावा विश्रामगृह वरळी २० बेड
३. कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई (सार्वजनिक बांधकाम विभाग, अंधेरी) ४१४ बेड
४. पश्चिम रेल्वे ९५ बेड
५. मध्य रेल्वे १८० बेड
६. एकूण ५ हॉटेल्समध्ये ३६७ रुमचे नियोजन केले आहे.
विलगीकरण सुविधा रुग्णालये
१. बृहन्मुंबई महानगरपालिका ९०८ बेड
२. खाजगी ३९९ बेड
३. शासकीय ६८५ बेड