उपमुख्यमंत्र्यांकडून अमरावतीत विविध कामांचा आढावा

अमरावती, दि. २१ : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता पंचनाम्याची प्रकिया तत्काळ पूर्ण करावी व नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून द्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आज मेजर ध्यानचंद स्टेडियमच्या उद्घाटनासह इतर कार्यक्रमांसाठी अमरावती येथे आले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अनौपचारिकरित्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. खासदार अनिल बोंडे, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर आदी अधिकारी उपस्थित होते.

श्री. फडणवीस यांनी अतिवृष्टीने झालेले नुकसान, प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्तांना भरपाईबरोबरच आवास योजना व इतर विविध योजनांचाही लाभ मिळवून द्यावा. सर्वदूर स्वच्छ पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. अमरावती शहरातील अंबा नाल्याची स्वच्छता करुन पुनरुज्जीवन करावे. सिताफळ प्रकल्प व संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला गती द्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

अवैध गुन्हेगारी रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा. गुन्हेगारांवर वचक निर्माण करा. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कठोर कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले. पोलीस निवासस्थाने व अकोला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामासह विविध बाबींचाही आढावा घेतला.

000