विधानसभा प्रश्नोत्तरे

उस्मानाबाद विद्युत अपघातप्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि 24 : उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे सकनेवाडी शिवारात उच्चदाब वाहिनीच्या विद्युत खांबाचा ताण तुटून खांब पडल्याची घटना घडली. यासंदर्भात तत्काळ विद्युत कंपनीच्या कामाची वस्तुस्थिती तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मौजे सकनेवाडी शिवारात वीज कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, प्रशांत बंब, प्राजक्त तनपुरे, नाना पटोले, अजय चौधरी यांनी सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मौजे सकनेवाडी येथे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत ११ केव्ही वीज वाहिनी व १० केव्ही रोहित्र उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी विद्युत खांबाचा ताण तुटुन वीज वाहिनीचे दोन खांब पडले.

यासंदर्भातील उपप्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, दोन खांबातील कमीत कमी अंतर ठरण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. जेथे विद्युत मीटर उपलब्ध नाही तिथे ते उपलब्ध करून देणे, शेतीपंप जोडणी, थकित बीलांसंदर्भातही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

०००

मराठवाड्यात फीडर सेपरेशनचे काम प्राधान्याने पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : महावितरण कंपनीमार्फत लातूर जिल्ह्यातील सिंगल फेज रोहित्र दुरूस्त करून अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून मराठवाड्यातील फिडर सेपरेशनचे काम प्राधान्याने ठराविक कालावधीत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत लातूर जिल्ह्यातील शेतीपंपांना अखंडीत वीज पुरवठा करण्याबाबत सदस्य अभिमन्यू पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, लातूर मंडळातील ६९७ सिंगल फेज रोहित्र तसेच ६२७ थ्री फेज रोहित्राचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. तसेच १५२ सिंगल फेज व १५८ थ्री फेज रोहित्र बदलण्याचे काम सुरू आहे. रोहित्र दुरुस्तीसाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

०००