कोळीवाड्यांचा विकास नवीन नियमावलीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई, दि 25 : मुंबई शहरातील कोळीवाड्यांचा विकास नवीन विकास नियमावलीनुसार केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील कोळीवाड्यांचे रेखांकन करण्यात आले आहे. रेखांकनाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टींचा विकास केला जाईल. मात्र रेखांकनात समावेश असलेल्या कोळीवाडा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी नवीन विकास नियमावली तयार करण्यात येत आहे. त्या नियमावलीनुसार कोळी वाड्यांचा विकास केला जाईल.
मुंबईतील विविध झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्रकल्पांबाबत सर्व आमदारांची व्यापक बैठक बोलावली जाईल. तसेच झोपडपट्टी पात्रतेबाबत एक विशेष कार्यप्रणाली विकसित केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्वसन विकास करताना भाडे न देणाऱ्या विकासकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. भाडे देण्यासाठी सक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कॅप्टन आर. तमिल सेल्वन, अस्लम शेख, योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
000
ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद –
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
राज्यातील ऐतिहासिक आणि वारसा स्मारकांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यासाठी विचार केला जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील विविध शहरांमधील ऐतिहासिक आणि वारसा स्मारकांचे जतन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व स्मारकांचे जतन करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यासाठी विचार केला जाईल. ही रक्कम येत्या तीन वर्षांसाठीच राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील चांदणी तलाव, रामेश्वर मंदिर, सावकार वाडा आदी केंद्र आणि राज्य संरक्षित स्मारकांच्या विकास आणि जतन-दुरुस्ती कामांसाठी सर्वांगीण विकास आराखडा पूर्ण करुन घेण्याचे नियोजन आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात येईल. तसेच केंद्र सरकारच्या विभागाशी पाठपुरावा केला जाईल, असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
000
अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार –
मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती
अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले की, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. रिक्त असणाऱ्या पदाच्या भरतीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
अल्पसंख्याक विभागाच्या अखत्यारितील विविध समित्या आणि मंडळावरील नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच अल्पसंख्याक विभागात निधी खर्च होण्यासाठी विविध विभागांशी समन्वय ठेवण्यात येईल, अशी माहितीही मंत्री भुमरे यांनी दिली.
सदस्य रईस शेख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
०००
शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार –
मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करणे, सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत.
पुणे मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सदस्य भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
याबाबत सदस्य सिध्दार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतला.