पिंपळेनरला एमआयडीसी कार्यान्वित होण्यासाठी गतीने कार्यवाही करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे शासनाचे 450 एकर क्षेत्र उपलब्ध आहे. तेथे एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कार्यान्वित होण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सी. वाय. पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, कार्यकारी अभियंता एम. एस. पाटील, उद्योजक नितीन बंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, पिंपळनेर परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होते. या पार्श्वभूमीवर तेथे व्हेजिटेबल पार्कच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. धुळे, नरडाणासह औद्योगिक वसाहतीतील अडचणी सोडविण्यासाठी वन विभागाबरोबर मुंबई येथे बैठक घेण्यात येईल. धुळे औद्योगिक वसाहतीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी हरणमाळ तलावावरील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने प्रस्ताव सादर करावा. तसेच धुळे औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी ‘एमआयडीसी’ने अत्याधुनिक आणि लहान वाहनांचा समावेश असलेला प्रस्ताव सादर करावा. औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे येथील विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा प्रस्तावही सादर करण्याची सूचना त्यांनी केली. ‘एमआयडीसी’ने औद्योगिक क्षेत्राचा विकास करतानाच उद्योजकांच्या अडी-अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. रस्ते, पाणी आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याशिवाय उद्योगांच्या बळकटीकरणासाठीही प्रयत्न करावेत. आगामी काळात ‘एमआयडीसी’ कार्यक्षेत्रात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात अवधान (ता. धुळे), नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे औद्योगिक वसाहत कार्यान्वित आहे. धुळे (अवधान) औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. पिंपळनेर येथील जागेची प्राथमिक पाहणी करण्यात आली असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. प्रादेशिक अधिकारी श्री. गावित यांनी सांगितले, ‘एमआयडीसी’च्या धुळे प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विकसित औद्योगिक क्षेत्राची संख्या 11 असून एकूण क्षेत्र तीन हजार 32 हेक्टर एवढे आहे. भूखंडांची संख्या साडेपाच हजार आहे. त्यापैकी चार हजार 281 भूखंडांचे वितरण झालेले आहे. यावेळी आमदार श्रीमती गावित, आमदार डॉ. फारुक शाह यांनीही विविध महत्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी लोकप्रतिनिधी, उद्योजक, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.