मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय
मुंबई, दि. 15 : मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उपलब्ध आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलदगतीने करण्यात यावा. मुंबईत नेत्र विकारांसाठी विशेष रुग्णालय करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबईत सध्या महापालिकेमार्फत १९ उपनगरीय रुग्णालयांचे बांधकाम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशभरातून कर्करोगाच्या उपचारासाठी मोठ्यासंख्येने रुग्ण येथील टाटा रुग्णालयात येतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवासाची सोय व्हावी यासाठी लोकमान्य नगर मधील म्हाडा वसाहतीत खोल्या उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर सायन, सांताक्रुझ येथे अशा प्रकारची सोय करण्यासाठी मुंबई महापालिकेने देखील पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
मुंबई महानगरातील आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आमदार सदा सरवणकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी यावेळी उपस्थित होते.
टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी म्हाडामार्फत लोकमान्य नगर मधील वसाहतीतील खोल्या उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी म्हाडाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या. शिवडी येथील स्वतंत्र भुखंडावर म्हाडातर्फे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी इमारत उभारता येईल, असे श्री. डिग्गीकर यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेमार्फत सध्या केईएम, सायन, नायर, कूपर हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालये आणि नायर दंत महाविद्यालयासोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी ८ असे एकूण १६ उपनगरीय रुग्णालये चालविली जातात. उपनगरीय रुग्णालयांमध्ये ४ मोठी, ४ मध्यम आणि ८ लहान रुग्णालयांच्या माध्यमातून सुमारे ३२४५ रुग्णशय्या उपलब्ध आहेत.
बोरिवली येथील हरिलाल भगवती रुग्णालय, गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय, वांद्रे येथील खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालय, मुलुंड येथील मनसादेवी तुलसीदास अगरवाल रुग्णालय, विक्रोळी येथील क्रांतीवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, राजावाडी या रुग्णालयांच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. तर चांदिवली येथे संघर्षनगर, कांदिवली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालीटी रुग्णालय, नाहुर येथे भांडुप मल्टीस्पेशालिटी हे नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे.
कामाठीपुरा ई विभागात सिद्धार्थ नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास प्रस्तावित असल्याचे आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.
विक्रोळीतील क्रांतीवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचे पुनर्विकासाचे काम करताना त्याठिकाणी ५०० खाटांची सुविधा करावी. त्याचबरोबर तेथे सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या रुग्णालयाचे काम होईपर्यंत या भागातील रुग्णांना शुश्रुषा रुग्णालयामध्ये उपचार देण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
यावेळी एएए हेल्थकेअर संस्थेतर्फे रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा कशी मिळू शकते यासाठी कूपर, सायन, नायर रुग्णालयांचे ऑडीट करण्यात आले आहे. त्याचे सादरीकरण यावेळी झाले. राज्य शासनाच्या सामान्य रुग्णालयांचे देखील यापद्धतीने ऑडीट करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.
००००