राज्यातील पर्यटनाच्या बलस्थानांवर काम होणे गरजेचे – पर्यटन तज्ज्ञ अमिताव भट्टाचार्य

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून, राज्यातील अमूर्त सांस्कृतिक वारसा जाणून घेवून, स्थानिक पर्यटन विषयक बलस्थानांना चालना देण्यासाठी  प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी माहिती कोलकाता येथील अमूर्त सांस्कृतिक वारसा क्षेत्रात कार्य करणारे पर्यटन तज्ज्ञ अमिताव भट्टाचार्य यांनी दिली.

‘जागतिक पर्यटन दिन’ येत्या 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पर्यटन विषयक चर्चासत्र आयोजित केले आहेत. त्याअंतर्गत अमूर्त सांस्कृतिक वारसा विषयी दूरदृश्यप्रणालीद्वारे पर्यटन विषयक चर्चा सत्रात अमिताव भट्टाचार्य बोलत होते. या चर्चासत्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चावरे, आय. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य निश्चित श्रीवास्तव, राज्यातील पर्यटन क्षेत्रातील प्रादेशिक व्यवस्थापक, हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, पर्यटन क्षेत्रातील विविध देशांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

श्री.अमिताव भट्टाचार्य यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून पश्चिम बंगाल व राजस्थान येथे पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. स्थानिक संस्कृतीला पर्यटनाची जोड देवून रोजगारात वाढ करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवता येतात. स्थानिक ठिकाणची पर्यटन विषयक बलस्थाने लक्षात घेऊन त्याअनुषंगाने कौशल्यवृद्धी, लघुउद्योगांचे बळकटीकरण, सामाजिक व आर्थिक निकषांचा अभ्यास, स्थानिक कलाकारांची निवड, महिला बचतगटांचे सहाय्य, महिला सबलीकरणाच्या माध्यमातून विविध पर्यटन विषयक उपक्रमांना देण्यात आलेली बळकटी, परदेशातून पर्यटक येण्यासाठी सुरू करण्यात आलेले पर्यटन महोत्सव याबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना स्थानिक पर्यटन उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी  सुरू असलेल्या उपक्रमांची यावेळी सविस्तर माहिती दिली.

यावेळी प्रास्ताविक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी करून राज्यातील पर्यटन विषयक सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली, तर आभार महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी मानले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/21.9.22