राज्यातील लम्पीबाधित ४ हजार ६०० जनावरे रोगमुक्त – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती

मुंबई, दि. 21 : राज्यामध्ये दि. 21 सप्टेंबर 2022 अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली, रायगड व नंदुरबार अशा 28 जिल्ह्यांमधील एकूण 1 हजार 406 गावांमध्ये फक्त 13 हजार 425 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 13 हजार 425 बाधित जनावरांपैकी 4 हजार 600 जनावरे उपचाराद्वारे रोगमुक्त झाली आहेत. उर्वरित बाधित जनावरांवर उपचार सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 73.53 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परीघातील 1 हजार 406 गावातील 23.25 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले.

शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खाजगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी, अशा सूचनाही श्री. सिंह यांनी दिल्या.

00000

राजू धोत्रे/विसंअ/21.9.22