अमरावती, दि. 6 : मेळघाटातील कुपोषण निर्मूलन व इतर प्रश्न सोडविण्यासाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणेबरोबरच सर्व विभागांनी समन्वय व सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीपकुमार व्यास यांनी आज येथे दिले.
मेळघाटातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने श्री. व्यास यांनी पथकासह मेळघाटातील विविध गावांचा दौरा केला. या दौ-यात आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाडी आदी ठिकाणी भेटी, स्वयंसेवी संस्थांशी चर्चा व नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्याबाबत विविध विभागांच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक श्री. व्यास यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, माजी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. सतीश पवार, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, धारणी येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी सावनकुमार यांच्यासह आरोग्य, आदिवासी विकास, महिला व बालविकास आदी विभागांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
श्री. व्यास म्हणाले की, मेळघाटात संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावा. बाळाचे वजन घेण्याच्या पद्धतीनुसार त्याची नोंद रजिस्टरमध्ये घेतली जाते. हा डेटा संगणकीकृत असावा. त्यामुळे आधीच्या महिन्यांतील वजनाची माहिती लगेच मिळू शकेल. माहितीचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. बाळाचे किंवा गर्भवती मातेचे वजन केल्यानंतर आधीच्या महिन्यांतील वजनाच्या तुलनेत ते वाढले किंवा कसे, हे तपासण्यासाठी डेटा लगेच उपलब्ध झाला पाहिजे. जेणेकरून वजन कमी झाल्याचे आढळताच आवश्यक ते उपाय वेळेत करता येतील.
वैद्यकीय अधिका-यांनी आशासेविकांच्या बैठका घेताना अंगणवाडी सेविका, आयसीडीएस कर्मचारी यांनाही सहभागी करून घ्यावे. पोषण पुनर्वसन केंद्र किंवा दक्षता कक्षातून बरे होऊन एखादे बाळ घरी येते तेव्हा त्यानंतरही अंगणवाडी, आशा सेविकांनी संपर्क, समन्वय, देखरेख ठेवली पाहिजे. एएनएमची पदभरती पूर्ण करावी. गाभा समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
मेळघाटात बँकिंग व्यवहारातही अडचणी येतात. बँकेत खाते उघडायचे असेल तरी अनेक दिवस जातात, अशी स्थानिक बांधवांची तक्रार आहे. त्यासाठी योग्य कार्यवाही व्हावी. मेळघाटात स्थलांतर रोखण्याच्या दृष्टीने मनरेगा कामांत सातत्य ठेवावे. आश्रमशाळांतील व शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व्हावी. विद्यार्थ्यांची नेत्रतपासणीही पूर्ण करून घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
एखादा रूग्ण रेफर करताना त्याची माहिती ठेवण्यासाठी रेफरल इन आणि रेफरल आऊट असे दोन्ही रजिस्टर ठेवावेत, असेही निर्देश देण्यात आले.
०००