जमीन अधिग्रहण संदर्भात जनतेला अद्ययावत माहिती द्या – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 मुंबई, दि.7 :- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि रेवस-कारंजा पूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जलद वाहतूक तसेच व्यापारउद्दिम, दळणवळण यांना चालना मिळणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प वेळेत सुरु व्हावा आणि बाकी असलेल्या कामांसंदर्भात जमीन अधिग्रहण विषयक प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी जनतेला अद्ययावत माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज दिले.

आज विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प व रेवस-कारंजा पूल कामांच्या सद्यस्थिती संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सिडको यांचेतर्फे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष यांनी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेत या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट गाठले जावे आणि भविष्यात गर्दीच्या ठिकाणी “बॉटलनेक” परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या.

एमटीएचएलचा हा प्रकल्प शिवडी येथे सुरु होऊन चिर्ले येथे संपतो. रेवस-कारंजा प्रकल्प सिडको द्रोणागिरी जवळ सुरु होऊन रेवसकडे जातो. रेवस-कारंजा प्रस्तावित पुलाची लांबी ८.८ कि.मी. आहे.  याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाचे काम डिसेंबर, 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.  रेवस ते रेवदंडा मार्ग विभागात जमीन खरेदी-विक्री व बांधकामाचे व्यवहार वेगात सुरु आहेत.  स्थानिक शेतकऱ्यांचे आणि रहिवाश्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रस्तावित महामार्गाची आखणी, नकाशा, बाधित होणारे सर्व्हे नंबर याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रसिद्ध करावी, असे निर्देश ॲङ श्री. राहुल नार्वेकर यांनी दिले.

समुद्रात मार्ग उभारणीचे काम अत्याधुनिक पद्धतीने सुरु आहे, याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार असून पर्यायाने विकासाचा पुढील टप्पा गाठला जाणार आहे. हे काम वेगाने पूर्ण होत असल्याबद्दल ॲङ श्री. राहुल नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले असून तातडीने सदर प्रकल्प कार्यान्वित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

०००