विधिमंडळ अधिवेशन : माध्यम कक्षाचे उद्घाटन; श्रीमती जयश्री भोज यांचा पत्रकारांशी संवाद

0
11

नागपूर, दि. १९ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सिव्हिल लाईन्स येथील ‘सुयोग’ निवासस्थानी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्रीमती भोज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून शासनाच्या विविध योजना, निर्णय यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये माध्यमांचे योगदान मोलाचे आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सहकार्य करण्यात येईल”, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी इतर विविध मुद्यांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.

माध्यम कक्षामध्ये पत्रकारांसाठी संगणक, वायफाय सुविधेसह इतर सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर संचालक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी पत्रकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महासंचालक श्रीमती भोज यांनी यावेळी या सोयी-सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर आरोग्य कक्षाची पाहणी केली. या सोयी-सुविधांबाबत पत्रकारांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी संचालक (प्रशासन) तथा नागपूर विभागीय संचालक हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, नागपूर शिबिर प्रमुख विवेक भावसार, सह शिबिर प्रमुख प्रवीण पुरो, महेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र बारई यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

इरशाद बागवान/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here