चित्र अमृत प्रदर्शनीचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. 20 : चित्र अमृत प्रदर्शन म्हणजे चित्रकारांनी साजरा केलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्र अमृत प्रदर्शनाचे कौतुक केले.

नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाने नटराज आर्ट ॲन्ड कल्चर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “चित्र अमृत” या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षिका डॉ. जया वाहने, नटराज आर्ट कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ.रवींद्र हरिदास यांच्यासह अनेक अधिकारी व चित्रकार उपस्थित होते.

नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. डॉ. जया वाहने आणि डॉ. रवींद्र हरिदास यांनी या उपक्रमाची माहिती मंत्री महोदयांना दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “75 दिवस – 75 कलाकार – 75 चित्रे – 75 गावात प्रदर्शने” अशी या “चित्र अमृत” प्रदर्शनाची संकल्पना आहे. ही सर्व चित्रे स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित घटना वा व्यक्तींची आहेत. तसेच स्वतंत्र भारताला उंची गाठून देणाऱ्या व्यक्ती व घटनाही यात आहेत.

000