‘संस्कृत’ मानवहिताची भाषा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. २१ : भारतीय संस्कृती, आयुर्वेद, योग या गोष्टी जाणून घेण्यास जग आतुर आहे. जगातील इतर देशातील लोकांचीही संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. संस्कृत ही  केवळ राष्ट्रहिताचीच नव्हे तर मानवहिताची भाषा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज रामटेक येथे केले.

रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षान्त सभारंभप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी अध्यक्ष म्हणून स्नातकांना मार्गदर्शन करीत होते. या सोहळ्यास दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवासा वरखेडी, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय संस्कृतचे विद्वान काशिनाथ न्युपाने, कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे कुलगुरु मधुसूदन पेन्ना, कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी आदी उपस्थित होते.

आपल्या संबोधनाची सुरुवात संस्कृतमध्ये करून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, संस्कृतचा प्रभाव सर्वदूर पसरला आहे. भारताला जाणून घेण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. आपल्या मातृभाषेचा, प्राचीन संस्कृतीचा आपल्याला गौरव आहे. संस्कृत भाषेत शिक्षण घेणे किंवा आचार्य पदवी प्राप्त करणे, हे आपले सौभाग्य आहे. संस्कृत ही सरल भाषा असून व्यवहारात जास्तीत जास्त उपयोगात आणण्यासाठी व तळागाळापर्यंत सन्मान वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे, असे आवाहन त्यांनी स्नातकांना केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. व्यावहारीकदृष्ट्या इंग्रजी आवश्यक आहेच. मात्र, शालेय शिक्षणात पहिल्या तीन वर्गापर्यंत मातृभाषेत शिक्षण देणे याबाबीचा शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कारक्षम शिक्षण मिळत आहे. संत कालिदासांची सुभाषिते अप्रतिम असून विद्यार्थ्यांनी जीवनात त्यांचा अवलंब करावा. ‘विद्या विनयेन् शोभते’ हे नेहमी लक्षात ठेवावे. पदवी, पदक मिळाले तरी विद्यार्थ्यांनी विनम्र राहणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

राज्यपाल पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरता, स्वयंरोजगार, स्टार्टअप या गोष्टीला विशेष प्राधान्य दिले आहे. संस्कृत भाषेचा प्रसार करण्यातही आपण स्टार्टअप करू शकतो. संस्कृत मध्ये पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी गावागावात जावून संस्कृतचे धडे द्यावे. आज डी.लिट (मानद) मिळालेले प्रा. श्रीनिवासा वरखेडी हे याच विद्यापीठाचे कुलगुरू होते. आता ते दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तरी त्यांनी नागपूर (रामटेक) हे देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे या विद्यापीठाकडे विशेष लक्ष द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. आचार्य पदवी व पदक मिळालेल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करून श्री. कोश्यारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कुलगुरू प्रा. पेन्ना यांनी स्वागत केले. प्रमुख अतिथी प्रा. न्युपाने आणि प्रा. वरखेडी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. पराग जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा  प्रारंभ व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. विद्यापीठाचे प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, विद्यार्थी, पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे आहेत डी. लिट व आचार्य पदवी मिळविणारे मान्यवर :

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. कोश्यारी  यांच्या हस्ते प्रा. श्रीनिवासा वरखेडी यांना डी. लिट (ऑनररी) तर आध्यात्मिक तत्वज्ञान आणि मराठी शाहिरी कविता यासाठी डॉ. राजेंद्र वाटाणे यांना डी. लिट (अकादमी) पदवीने सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट शोध प्रबंध सादर केल्याबद्दल सुमीत कथळे, प्रतीक जोशी, माधव आष्टीकर आणि कविता भोपळे (गोमाशे) यांना गौरविण्यात आले. तसेच आचार्य पदवी व मेडल प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये भक्ती पुरंदरे, अनुराग देशपांडे, प्रिती केवलरमानी, कांचन गोडबोले, मंजुश्री माटे, श्रृष्टी खंडाळे, चेतना उके, शीतल सदाळे, श्वेतांबरी चोथे यांचा आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून प्रियंका बांगडे हीचा राज्यपालांनी गौरव केला.

000