धुळे जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाकरिता निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशील – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

नागपूर, दि. २२ : धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 26 शाळांच्या 61 वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी विविध शीर्षकाखाली निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. निधीच्या उपलब्धतेसाठी लवकरच धुळे येथे बैठक घेण्यात येईल, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

विधानसभेत सदस्य कुणाल पाटील यांनी आज अर्धा तास चर्चेत धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 26 शाळांच्या 61 वर्ग खोल्या मोडकळीस आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत मंत्री श्री. महाजन बोलत होते.

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेचा स्व-निधी, जिल्हा वार्षिक योजना, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध होण्यासाठी बैठकीचे आयोजन करून प्रयत्न केले जातील.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, देवराम होळी, प्रकाश सोळंके, प्रा. वर्षा गायकवाड, डॉ.भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला.

00000

गोपाळ साळुंखे/स.सं.