वनविकास महामंडळाने मोठी झेप घ्यावी : वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 26 : वनविकास महामंडळाची क्षमता प्रचंड असून ती पूर्णतः वापरत महामंडळाने लवकर मोठी झेप घ्यावी, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे वनविकास महामंडळाची संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली, त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नागपूर भागात फर्निचर क्लस्टर, फर्निचर बनविणाऱ्या कारागिरांसाठी एका छताखाली भाडे तत्वावर यंत्रे व उपकरणे वापरू देणारा कारखाना, लाकूड कारागिरांचा कौशल्य विकास, त्यांच्या फर्निचरला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न, वनोद्याने विकसित करून देणारी व्यावसायिक सेवा, महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष जोपासना आणि वृक्ष संवर्धन, चंद्रपूर येथे नवीन व्याघ्र सफारी तर गोरेवाडा येथे आफ्रिकन सफारी तयार करणे अशा अनेक महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. वनविकास महामंडळाने आता व्यावसायीक क्षेत्रात झेप घेण्याची आवश्यकता आहे, असे सांगून सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक सूचना या बैठकीत केल्या. वनविकास महामंडळाने संबंधित विविध क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.

नागपुरात फर्निचर क्लस्टर आणि सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणार

नागपुरात फर्निचर क्लस्टर उभारून स्थानिक फर्निचर उत्पादक कुशल कारागिरांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न वनविकास महामंडळाने करावा, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली. लाकूड कारागिरांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवावा आणि त्यांना यंत्रे व उपकरणे भाड्याने उपलब्ध करून देण्यासाठी एक सार्वजनिक सुविधा केंद्र वनविकास महामंडळाने निर्माण करावे असे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे ज्यांना सुतारकामाची उपकरणे व जागा विकत घेणे परवडत नाही, अशा कारागिरांना कामाच्या कालावधीपुरती जागा व उपकरणे उपलब्ध होतील आणि त्यांचा व्यवसाय बहरेल असे ते म्हणाले.

वनविकास महामंडळाने अशा स्थानिक उत्पादित फर्निचरला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध मोठ्या कंपन्यांशी बोलणी करावीत, अशीही सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

लॅण्डस्केपिंग आणि वनोद्याने विकसित करणार

वनविकास महामंडळाने विविध कंपन्या, प्रकल्प, रस्ते, विकास प्रकल्प यासाठी लॅण्डस्केपिंग आणि सौंदर्यीकरण सेवा व्यावसायिक पातळीवर द्यावी, अशीही सूचना श्री. मुनगंटीवार यांनी वनविकास महामंडळाच्या संचालकांना केली आहे. प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला सौंदर्यीकरण, लॅण्डस्केपिंग यांची गरज असते. त्या सेवा वनविकास महामंडळाने विकसित कराव्यात आणि व्यावसायिक पातळीवर त्या पुरवाव्यात असे ते म्हणाले.

महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष लागवड

राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. महामार्गांच्या दुतर्फा ही वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन आणि जोपासना हे काम वनविकास महामंडळाने करावे, त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बोलणी करून करार करावा, असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

चराऊ कुरणांचा विकास

राज्यात चराऊ कुरणांची कमतरता आहे आणि त्याचवेळी हजारो एकर जमिन पडीक आहे. या पडीक जमिनींवर चराऊ कुरणांचा विकास वनविकास महामंडळाने करावा. त्या कुरणात उत्पादन झालेल्या चाऱ्याचे भारे नवीन तंत्रज्ञान वापरून वेष्टित करून महिनोन महिने टिकवता येतील या विषयात वनविकास महामंडळाने स्वतःचे नैपुण्य निर्माण करावे आणि राज्यातील चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यास हातभार लावावा, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आफ्रिकन सफारी आणि टायगर सफारी

नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी तसेच चंद्रपूर येथे नवीन टायगर सफारी या तज्ञांच्या मदतीने वनविकास महामंडाळाने उभाराव्यात, त्याकरता आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

देशात 56 हजार कोटींचे लाकुड आयात करावे लागते. तर आपल्याकडे लाकुड व अन्य वनोत्पादनाकडे दुर्लक्ष केले जाते. वनविकास महामंडळाने वनखात्याच्या वनोत्पादने व लाकुड यांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचे काम करावे, जेणेकरून परकीय गंगाजळी वाचेल, अशी सूचनाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

हरित इंधनाचा व्यवसाय

चंद्रपूर गडचिरोली च्या वनांमध्ये बांबूची अतिरिक्त वाढ झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. हे अतिरिक्त बांबू तोडण्यासाठी बाहेरच्या कंपन्यांना काम द्यावे लागते. त्याऐवजी वनविकास महामंडळानेच ही बांबू तोड करून त्या बांबूला बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम करावे अशीही सूचना ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्याचबरोबर त्या बांबूपासून हरित इंधन (पॅलेटस्) तयार करून ते बाजारपेठेत पुरवावे असेही निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

वनविकास महामंडळाने व्यावसायिक क्षेत्रांचा विस्तार करतांना कामाचा वेग व दर्जा उच्च राखावा, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. या बैठकीत प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान वनबलप्रमुख श्री. राव, श्री. विकास गुप्ता, यांच्यासह वनविकास महामंडळाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

00000