‘राष्ट्रपुरुष अटल’ महानाट्यातून अटलजींचा जीवनपट जगासमोर येणार – संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील

0
8

नागपूर, दि. 27 : ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्यातून माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या महान कर्तृत्व,नेतृत्वाचा आणि समर्पित देशसेवेचा संदेश जगासमोर येणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आज येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी  वाजपेयी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रवीण दटके, प्रवीण दरेकर, आशिष शेलार,सुभाष देशमुख,सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर  उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित या महानाट्याचा प्रयोग ही अटलजींच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा परिचय देणारी कलाकृती ठरावी असेच यातील पात्र व रचनेचे अवलोकन करताना प्रतित होते. नुकतेच 25 डिसेंबर रोजी अटलजींचा जन्मदिन साजरा झाला. याचेच औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून आज या महानाट्याचे सादरीकरण होत असल्याचे समाधान आहे. या महानाट्याच्या माध्यमातून अटलजींचे देशसेवेसाठी समर्पित जीवन, त्यांनी देशाला दिलेले नेतृत्व, त्यांच्या कविमनाचा परिचय जनतेला होईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

प्रास्ताविकात सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रत्येक शब्द हा ऊर्जा देणारा होता. सूर्याप्रमाणे तेजस्वी त्यांच्या आयुष्यावर काही अंशी प्रकाश टाकण्याचा या नाटकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. कवी मन जपणारे अटलजी  यांनी देशाच्या राजकारणात अमीट छाप सोडली. राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व  म्हणून त्यांची ओळख आहे. ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्याला जोडून त्यांनी ‘जय विज्ञान’ हा नारा देत आधुनिकतेला साद घातली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपासून ते संसदेपर्यंत त्यांची भाषणे ही अविस्मरणीय असायची. त्यांच्या जीवनातील अशाच विविध पैलूंना या महानाट्यातून पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ऊर्जा उत्साह आणि प्रेरणा या महानाट्यातून आपल्याला मिळेल, असे श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले.

या नाटकातील कलाकार , निर्माते दिग्दर्शक यांचा श्री पाटील आणि  श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  उपेंद्र कोठेकर यांनी मराठीत अनुवाद केलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या परिचय या कविताचे लोकार्पण करण्यात आले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसचिव विलास थोरात यांनी केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here