सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक गमावला : सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

मुंबई, दि.१: ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक आपण गमावल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मामी फिल्म फेस्टिव्हलची मूळ संकल्पनाच सुधीर नांदगावकर यांची. चित्रपट हा विशेष जिव्हाळ्याचा विषय.चित्रपट संस्कृतीच्या प्रचाराचा ध्यास घेतलेल्या श्री.नांदगावकरांनी अनेक चित्रपट महोत्सवांच्या आयोजनात सक्रिय योगदान दिले आहे. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली चळवळ म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा मानबिंदूच ठरली. फिल्म फोरम, प्रभात चित्र मंडळ, थर्ड आय चित्रपट महोत्सव या माध्यमातून नांदगावकरांनी जे कार्य केले ते तर  या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. चित्रपटांचे केंद्र दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे वळवण्यात त्यांच्या प्रयत्नांचा वाटा मोठा होता. दिग्दर्शक भारतत्न सत्यजित राय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ही त्यांची दैवते होती.  नांदगावकरांनी त्यांच्या समीक्षणातून सुसंस्कृतता व अभ्यासू वृत्ती कायम जपली . त्यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून एक व्यासंगी विद्वान आपण गमावला आहे. नांदगावकर कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात सहभागी मी आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

000