पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्यात यावर्षी लाखो अनुयायी सहभागी झाले होते. नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्तम नियोजन,अनुयायांची शिस्त, त्यांनी प्रशासनाला केलेले सहकार्य यामुळे सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोहळ्यासाठी सहकार्य करणारे अनुयायी, विविध संस्था-संघटना आणि ग्रामस्थांना त्यासाठी विशेष धन्यवाद दिले.
सोहळ्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. कोरोनाचे निर्बंध दूर झाल्याने यावर्षी अधिक प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोहळ्यासाठी अधिकच्या सुविधा देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि कार्यक्रमस्थळी विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या. पूर्वतयारी करताना विविध संघटनांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले.
पोलीस दलाची चांगली कामगिरी
सोहळ्यासाठी ८ हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी, ७४६ होमगार्ड्स आणि राज्य राखील दलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे शहरचे साडेपाच हजार तर पुणे ग्रामीणचे २ हजार ७०६ पोलीस अधिकारी- कर्मचारी तैनात होते.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे १८५ सीसीटीव्ही आणि ३५० वॉकीटॉकी, ६ व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व हालचालींवर पोलीसांचे लक्ष होते. एवढा मोठ्या जनसमुदायाचे नियंत्रण करताना पोलीस काही ठिकाणी अनुयायाना सहकार्य करतांनाही दिसत होते.
पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे १०० सीसीटीव्ही, १० ड्रोन कॅमेरे, शंभर दुचाकीस्वार, १० दहशतवाद विरोधी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सलग ३० तास बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनतळाची तत्परतेने व्यवस्था
सार्वजनिक बांधकाम विभागाने जयस्तंभाची सजावट, परिसरातील नियोजन उत्तमरितीने केले. रस्त्याची दुरुस्ती, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण अशी कामे अत्यंत कमी वेळात त्यांनी पूर्ण केली. चार ठिकाणी हायमास्ट, पीए सिस्टीम, २७ ठिकाणी स्वतंत्र जनित्राची व्यवस्था करण्यात आली. पूर्व विभागातर्फे सुमारे २ लाख चौरस मीटरचे ८ वाहनतळ तयार करण्यात आले होते. विविध विभागांसाठी आश्यक सुविधाही निर्माण करण्यात आल्या. दक्षिण विभागातर्फे ६० एकर परिसरात १४ वाहनतळ तयार करण्यात आले.
स्वच्छ आणि आरोग्यदायी सोहळा
जिल्हा परिषदेची आयोजनातली भूमिकाही तेवढीच महत्वाची होती. गेल्या वर्षापेक्षा अधिक स्वच्छता हे यावेळचे वैशिष्ठ्य होते. सोहळ्यानंतरही रात्रीतून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. ८० घंटागाड्यांच्या माध्यमातून ३ टन ओला आणि ८ टन कोरडा कचरा संकलीत करण्यात आला. १७५ ठिकाणी तात्पुरत्या कचाकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासाठी २२५ स्वच्छता कर्मचारी २४ तास प्रयत्न करत होते.
विशेषत: जयस्तंभ व वाहनतळ परिसरातील १ हजार ५०० शौचालय सातत्याने स्वच्छ ठेवण्याचे काम आव्हानात्मक होते, ते स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चांगल्यारितीने केले. ५ झेटींग यंत्र व मैला बाहेर काढण्यासाठी १५ सक्शन यंत्राचाही उपयोग करण्यात आला. शौचालयाचे ठिकाण नागरिकांना कळावे यासाठी आकाशात बलून सोडण्यात आले होते. हात धुण्यासाठी १५ हॅण्डवॉश स्टेशन बसविण्यात आले.
महिलांसाठी विशेष व्यवस्था
स्तंभ परिसर आणि वहानतळाच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रुम उभारण्यात आल्या होत्या. स्तनदा मातांसाठी तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षांचा १६८ महिलांनी लाभ घेतला. कक्षात माता व बालकांसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. कक्षासाठी ३१ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
बीएसएनएलतर्फे माध्यम कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व मोबाईल कंपन्यांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यावर्षी कॉलड्रॉपच्या तक्रारी आल्या नाहीत. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सकाळी ६ ते १२ या वेळेत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. समाज माध्यमाद्वारेदेखील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाल्याने येथे येऊ न शकलेल्यांना घरबसल्या सोहळा पाहता आला.
सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार
बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाने हा संपूर्ण सोहळा योग्यरितीने पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. विविध संघटनांशी समन्वय साधल्याने सोहळ्याचे योग्य नियोजन करणे शक्य झाले. एसडीआरएफ, एनडीआरएफ सारख्या संस्थांचेही आपत्तीव्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले. महावितरणने अखंडीत वीज मिळावी यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.
अनुयायांसाठी बसेसची सोय
पीएमपीएलतर्फे ३१ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ( शिक्रापूर ते कोरेगाव) ३५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्किंग ते वढु या मार्गावर ५ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोलनाका ४० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. १ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ते कोरेगाव ११५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्कींग ते वढु २५ बसेस द्वारे रात्री ११ पर्यंत सेवा देण्यात आली. दुपारी गर्दी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २२ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.
लोणीकंद ते पेरणे टोलनाका मार्गावर १४० बसेस विविध वाहनतळावरून उलपब्ध करून देण्यात आल्या. पुणे ते लोणीकंद करीता सुमारे ९० बसेस पुणे स्टेशन, मनपा भवन, पिंपरी, अप्पर इंदिरानगर आदी ठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आल्या. पीएमपीएमएलचे सुमारे ८५० चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी व २५ डेपो मॅनेजर, इंजिनिअर अधिकारी नेमण्यात आले होते. बसेच्या सुमारे १० हजार फेऱ्याद्वारे ५ लाख अनुयायांनी लाभ घेतला.
वाहनतळावरील नियोजनही उत्तम होते. सर्व वाहनांची शिस्तीत ये-जा सुरू असल्याने वाहतूकीसाठी कोणतीही अडचण आली नाही. वाहतूक शाखेनेदेखील या मार्गावरील वाहतूक वळवून योग्य नियोजन केले.
आरोग्य सुविधा आणि तत्पर उपचार
आलेल्या अनुयायांना आरोग्यसुविधेचाही चांगला लाभ झाला. ४८ रुग्णवाहिका, ७ कार्डीयाक रुग्णवाहिका, १० आरोग्यदूत आणि २१ पथकांनी उत्तम आरोग्य सुविधा दिली. सुमारे २७ हजार बाह्यरुग्ण, २३०० स्क्रीनिंग, ४१ संदर्भित (सर्वांची प्रकृती स्थिर) रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले.
यावर्षी पिण्याच्या पाण्याचीही चांगली व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेने १५० टँकर्सची व्यवस्था केली होती. त्यापैकी साधारण ६० ते ७० टक्के पाणी वापरले गेले. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली होती.
समूह भावनेमुळे सोहळा यशस्वी
प्रशासनातील विविध यंत्रणा, विविध संस्था आणि अनुयायांनी संवेदनशीलतेने आपले कर्तव्य पार पाडताना समूहभावनेचा उत्तम परिचय दिल्याने हा सोहळा यशस्वी झाला असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वांना धन्यवाद देताना हा सोहळा समन्वयाचे आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरेल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनुयायांसाठी स्वयंस्फुर्तीने भोजन, पिण्याचे पाणी, नाश्ता, चहा आदी व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिकांनी आपल्या अंतिथ्यशिलतेचा परिचय देत अनुयायांचे स्वागत केले. एस्कॉनसारख्या संस्थेने पोलीसांच्या भोजनाची व्यवस्था केली. या सर्वांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.
000