जगातील आणि महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून मजबूत व्हावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 4 : “विश्वातील विविध विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून अधिक मजबूत होण्याची शक्यता विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे”, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्व मराठी संमेलन २०२३ या कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘मराठी भाषा : काल, आज आणि उद्या’ या विषयी चर्चा सत्राच्या अध्यक्ष म्हणून डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जगातील ज्या विद्यापीठांमध्ये याआधीच समन्वय झालेला आहे, तिथे तो समन्वय अधिक मजबूत व्हावा तसेच त्या विद्यापीठांमध्ये आणि आपल्याकडील विद्यापीठात मराठी भाषेच्या बरोबरच इतिहास, विज्ञान, गणित, शेती या विषयी शिक्षणाच्या पद्धती अशा अनेक विषयांच्या अनुभवाची देवाणघेवाण आणि विचार मंथन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे”.

ज्याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार कपडे खरेदी करतो, विविध उपहारगृहांत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखतो, त्याप्रमाणे आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होण्यासाठी नवनवीन लेखकांची पुस्तके खरेदी करुन वाचावीत. पालकांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जगातील अनेक देशांमध्ये मराठी जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविणारी मंडळे आहेत. मराठी वृद्धिंगत होण्यासाठी अमेरिका, रशिया, जर्मनी अशा विविध देशात काम सुरू आहे. आपल्या राज्यातही शासनाच्यावतीने उपक्रम राबविले जातात, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

युरोपीय देशांतील महाराष्ट्रामध्ये यावे यासाठी प्रयत्न व्हावा, असे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी, या कार्यक्रमास जगभरातून मिळालेला प्रतिसाद पाहता मराठीचा प्रचार – प्रसार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “पंचायत राज विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भारताचा संबंध येत असल्याने गाव समृद्ध झाले तर आपोआपच राज्य आणि देश समृद्ध होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. गावातील माणूस आपल्या गरजा पूर्ण करू शकला तर शहरांवरचा ताणही वाढणार नाही”, असे ते म्हणाले. मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे ही केवळ शासनाचीच नाही तर प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी असल्याचे सांगून यासाठी प्रत्येकाने मातृभाषेबाबत अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार म्हणाले, “ज्याबद्दल आपल्याला प्रेम असते त्याबद्दलच चिंता व्यक्त होते. गेली अनेक दशके मराठी भाषेबद्दल अशीच चिंता व्यक्त केली जात असते, तथापि भाषा ही प्रवाही असल्याने शब्द येत – जात असतात. पण भाषा कधीच संपत नाही, ती टिकून राहते, मराठी ही ज्ञानाबरोबरच अर्थार्जनाची भाषा झाली पाहिजे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. मराठीमध्ये दरवर्षी सुमारे चार हजार पुस्तके प्रकाशित होतात, वाचकांनी यातील बदल आत्मसात करून जुन्या पिढीतील लेखकांबरोबरच नवीन पिढी काय लिहिते तेसुद्धा वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.

पॉप्युलर प्रकाशनचे हर्ष भटकळ यांनी प्रकाशक म्हणून विचार व्यक्त करताना, “वाचन जितके जास्त तितका शब्द साठा वाढतो”, असा अनुभव असल्याचे सांगितले. जगात महाराष्ट्राबाहेर सुमारे नऊ कोटी मराठी वाचक आहेत, मराठी भाषा आपली वाटली नाही तर नवीन पिढी इंग्रजीकडे वळते, असे सांगून भाषेकडे व्यापक नजरेने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पॉप्युलरच्या मराठी प्रकाशनाच्या ७० वर्षांच्या कालावधीतील विविध अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.

पत्रकार आणि साहित्यिक असलेल्या संजीवनी खेर यांनी विश्व मराठी संमेलन हा मराठीचा जागर असल्याची भावना व्यक्त केली. मराठीचे वाचक मोठ्या संख्येने आहेत, पण ही भाषा पुढच्या पिढीत बोलती राहिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी ही कमावण्याची भाषा आहे हा समज दूर होणे गरजेचे असल्याचे सांगून मराठी भाषेप्रमाणेच इतर भारतीय भाषांचीही ही समस्या असल्याचे त्या म्हणाल्या. हा समज सर्वांनी मिळून बदलावा लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठीची प्राचीनता अनेक ग्रंथांमधून दिसून येते. मराठीत ४०० हून अधिक बोली असून त्यांची गोडी अलौकिक असल्याचे त्या म्हणाल्या. भाषेची शब्दसंपत्ती वाढत राहिली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/