नागपूर दि. ५ : आपले संरक्षण दल व त्याच्या वेगवेगळ्या शाखा अखंडपणे देश संरक्षणासाठी सज्ज असतात. मात्र ही सज्जता, सक्षमता आणि आक्रमकता येते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानातून. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (डीआरडीओ) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रयोग व त्याची प्रात्यक्षिकांची माहिती येथे उपलब्ध करण्यात आली आहे. दालनाच्या सुरुवातीला आकर्षक ड्रोन ठेवण्यात आला आहे. पाच किलो वजनाचा हा ड्रोन शत्रूच्या सीमेत घुसून ५ कि.मी. परीसरात टेहळणी करू शकतो. युद्धकाळात मानव विरहीत टेहळणी करणारा ड्रोन सध्या युद्धनीतीमध्ये माहिती गोळा करणारे यंत्र म्हणून प्रामुख्याने वापरला जातो. विवाहाच्या चित्रीकरण करणाऱ्या किंवा पोलिसांनी वापरलेले ड्रोन यापेक्षा येथे ठेवण्यात आलेला ड्रोन अधिक सक्षम असतो.
याच दालनात अन्य एका स्टॉलवर ‘कन्फाईंड स्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल’ नावाचे अद्भुत यंत्र आहे. हे यंत्र जमिनीवर कुठेही दडवलेले स्फोटक शोधून काढते. एवढेच नव्हे तर पायऱ्या चढून स्वतःच स्फोटके लपवलेली बॅग शोधू शकते. स्फोटक शोधणे, उचलणे, स्फोटक जिवंत आहे अथवा नाहीत याचे विश्लेषण करणे. वेळ नसेल तर त्याच ठिकाणी स्फोटक निकामी करते. अशा पद्धतीचे केवळ रिमोट वर चालणारे हे यंत्र असून अडचणीच्या ठिकाणी ठेवलेले स्फोटक शोधून काढण्याचे कौशल्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मानवाच्या प्रतिकृतीत तसेच छोट्या खेळण्याच्या आकारात हे यंत्र लक्ष वेधून घेते.
‘सबमरीन सोनार सिस्टम’ ही यंत्रणा समुद्राच्या पोटातील हालचालींचे तांत्रिक विश्लेषण करते. समुद्रात निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी वरून नेमके अंतर कसे काढायचे, त्याचे विश्लेषण कसे करायचे, या विश्लेषणाचे नेमकेपणा कसा असतो, याबाबतची माहिती येथे दिली जाते. दिशा ठरवणे आणि अंतर ठरवणे अशी विभागणी सोनार सिस्टममध्ये केलेली असते. सैनिकी कारवाया, नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करताना हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जाते.
‘डिफेन्स जिओ इन्फॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ चंदीगड येथील संस्थेच्या कामकाजाची माहिती देते. ही संस्था हिमालयामध्ये निर्माण होणाऱ्या हिम वादळांसंदर्भात विश्लेषण देते. हिम वादळ निर्माण होणार अथवा कसे?यासंदर्भात सैन्यदलास माहिती देण्याचे काम ही संस्था करते. हिमालयामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षमतेचे बर्फाचे वादळ निर्माण होऊ शकते; याची कल्पना या संस्थेमार्फत दिली जाते. याशिवाय क्षेपणास्त्रांबाबतची अनेक दालने या ठिकाणी आहेत. यामध्ये मध्यम परिणामकारक मारा करणारे क्षेपणास्त्र व त्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. हवेतून हवेत मारा, हवेतून टॅंक निकामी करणारे, दीर्घ अंतरावर मारा करणारी अनेक क्षेपणास्त्रे येथे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
000